Thursday 18 July 2019

मुरलीधर वर्पे यांचे निधन


रांजणगाव देशमुख (वार्ताहर) :-
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी मुरलीधर रामजी वर्पे वय ९६ वर्षे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते रांजणगाव देशमुख सहकारी सोसायटीचे पंधरा वर्षे चेअरमन होते तसेच रांजणगाव ग्रामपंचायतीचे व स्थानिक स्कुल कमीटीचेही सदस्य पदही त्यांनी भुषाविले. त्यांच्या पश्चात सहा मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परीवार आहे.सामाजिक कार्येकर्ते भारत वर्पे,  नंदराम वर्पे यांचे ते वडील होत. त्यांचा दशक्रिया विधी २१ जुलै रोजी रांजणगांव देशमुख येथील पाझर तलावावर होणार असून यावेळी प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. 

Saturday 13 July 2019

अंजनापूर येथे ५ वर्षात २८८५ वृक्षांची लागवड आणि संवर्धन


विविध मान्यवरांची उपस्थिती, अंजनापूरचे काम देशासाठी प्रेरणादायी

शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
                                      आजकाल झाडे अनेक ठिकाणी लावले जातात परंतु त्याचे शंभर टक्के जतन होत नाही. याला अंजनापूर अपवाद आसुन या गावात गेल्या पाच वर्षापासुन वृक्षलागवडीची चळवळ वृक्षवेध फाऊंडेशनच्या माध्यमातुन व गावातील युवक व आबालवृध्दांच्या सहकार्याने सुरु आहेत. या गावाने फक्त झाडे लावलीच नाही तर ती शंभर टक्के जगविली आहेत. येथील युवकांचे काम दिपस्तंभासारखे आहे. हे काम राज्यातील इतर गावांना नक्कीच प्रेरणादायी आहे असे मत अनेक मान्यवरांनी कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथे व्यक्त केले.

                                     अंजनापुर येथे 2015 साली ४५  झाडे लावुन वृक्षलागवडीची सुरुवात वृक्षवेध फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या मदतीने झाली मागील चार वर्षात २१५२ झाडे लावली ती शंभर टक्के जगविली आहेत यावर्षी ७३३ झाडांची लागवड करण्यात आली आसुन आता २८८५ झाडांचे रोपण झाले आहे. गावात सहा जुलै ते 9 जुलै या कालावधीत वृक्षलागवड करण्यात आली. या वृक्षलागवड सप्ताहच्या शेवटच्या दिवशी डॅा अलका नितु मांडके, उद्योजक ऑलिव्हर ग्युबर्ग, प्रशांत जोशी, एच.डी एफ सी बॅंकेच्या सी एस आर फंडाच्या देशाच्या प्रमुख श्रीमती नुसरत पठाण, डॅा प्रकाश माधव, राजा उपाध्यय, श्रीमती शाईन इंदुलकर, जयवंत गडाख, कृषी विकास संस्थेचे अमीत नाफाडे, सुमन ठाकुर, अमोल जाधव, स्वाती शाळीग्राम, डॅा सरोज मेहेत्रे, डॅा अजित कुलकुर्णी, आदि प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बापुसाहेब गव्हाणे होते.

                            यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलतांना उद्योजक  ऑलिव्हर ग्युबर्ग म्हणाले कि, झाडाशिवाय जिवन अशक्य आहे. अंजनापुरकरानी सर्व झाडे जगवुन इतिहास निर्माण केला आहे. हे काम नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे.

                        डॅा. अलका मांडके म्हणाल्या कि,मला इथे आल्यानंतर उर्जा मिळाली आहे. आता यापुढे वारंवार येथे येत राहणार असुन या कामात सहभागी होणार आहे.

                         नुसरत पठाण म्हणाल्या कि, या गावातील सामाजीक उपक्रमाचां आम्ही एक भाग आहोत याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

                               अमीत नाफाडे म्हणाले कि, सामाजिक कामात अंजनापुरच्या युवकांचा सहभाग हा फार मोठा असतो. येणा-या काळात लोक आता राळेगणसिध्दी,हिवरे बाजार नंतर आता अंजनापुर पाहण्यासाठी नक्की येतील.

                                यावेळी एच.डी.एफ.सी बॅंक व कृषी विकास संस्था मलकापुर यांच्या वतिने हवामान केंद्राचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करुन ते वृक्षनेध फाऊंडेशन कडे हस्तातरीत करण्यात आले. यामुळे परीसरातील 25 किमी त्रिज्येतील हवामान अंजनापुरच्या शेतक-यांना एसएमएस ने कळणार आहे. यावेळी वृक्षसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षवेधचे सर्व युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.



Friday 5 July 2019

अंजनापूर येथे या वर्षी होणार ५८१ वृक्षांची लोखंडी जाळीसहीत लागवड






कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती ; 
आत्तापर्यंत २१५२ वृक्षांची लागवड आणि संवर्धन 
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                               कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे येत्या ६ ते ९ जुलै रोजी लोखंडी जाळीसहीत ५८१ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. 
                  अंजनापूर गाव गेल्या पाच वर्षांपासून वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन करत असून हे सर्व वृक्षवेध फाऊंडेशन अंजनापूर "एक वृक्ष जिवनाचा" ह्या संकल्पने खाली कार्यरत असुन पर्यावरण संगोपन, वृक्ष लागवड आणी रोपन केलेले झाडे, १०० टक्के जगवण्यासाठी वचनबध्द आहे, प्रत्येक माणसाने निसर्गाच्या उपकारातुन उतरायी  होण्यासाठी प्रती वर्ष एक वृक्ष रोपण करून संपुर्ण रितीने संगोपन करावे हा मुळ उद्देश ठेऊन, वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या सहभागातुन त्यांच्या नावाने लोखंडी जाळी सहीत वृक्ष रोपण करून सगळे झाडे शंभर टक्के जगवले आहेत. या संकल्पनेवर कार्य करतांना आजपर्यंत शेतकरी कुटुंबातील ९० पेक्षा जास्त स्वयंसेवक मागील पाच वर्षापासून निस्वार्थ भावाने वृक्ष सेवा करत आहेत. जुलै २०१५ ते जुलै २०१८ पर्यत २१५२ वृक्ष लोखंडी जाळी सहीत रोपण करून शंभर टक्के जगवले आहेत. त्यासाठी संपुर्ण लागनारे पाणी विकत घेतलेले आहे. ह्या ही वर्षी ६ ते ९ जुलै २०१९ रोजी लोखंडी जाळी सहीत ५८१ वृक्ष अंजनापूर येथे रोपण करून शंभर टक्के जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षारोपण करतांना थोडे वृक्ष लावुन ते संपुर्ण शंभर टक्के जगवण्यासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत कुठल्याही सरकारी मदतीशिवाय लोकसहभागातुन मोठे काम ऊभे केले आहे. वृक्षारोपण आणी वृक्षसंवर्धन या दृष्टिकोनातून ही संकल्पना राबवली तर मोठे सामाजीक परिवर्तन करणे शक्य आहे. हजारो झाडे लावण्यापेक्षा प्रत्येक गावातील लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक वर्ष थोड्याच संख्येने वृक्षारोपण करून शंभर टक्के जगवले तर, मोठे हरित परिवर्तन शक्य आहे, एक वृक्ष जीवनाचा टीम झाडे आणी पाणी या बद्दल सामाजीक संदेश देऊन सतत कृतीशील आहेत. ह्या संस्थेवर कुठलेही कर्मचारी कार्यरत नाहीत, ह्या संस्थेचे वैयक्तिक ऑफीस नाही, ह्या संकल्पनेवर भारतातून अनेक राज्यातील सहयोग देनारे शिक्षीत आणी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामांकित लोकं जोडले गेले आहेत, संपुर्ण नियोजन अतीशय  नियोजनपूर्वक करून प्रतेक वर्ष एकदाच झाडे लावतात, पंरतु वर्षभर काळजी घेऊन शंभर टक्के जगवले आहेत. ही संस्था सरकारी नियमानुसार रजिस्टर्ड असुन, 12A आणी 80 G  ह्या नियमावलीत समाविष्ट झालेली आहे. सर्वांनी वृक्षारोपण अभियानात आपल्या पवित्र श्रमदानासाठी उपस्थिती नोंदवावी असे आवाहन एक वृक्ष जिवनाचा अंजनापूर टीमने केले आहे.
                            दिनांक ८ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वृक्षसेवक व वृक्षमित्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यानंतर ८ ते १० वाजेपर्यंत स्नेहालय प्रेरित अनामप्रेम निर्मित अंध व दिव्यांग कलाकारांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.






Monday 1 July 2019

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाकडून मिळाला न्याय - ऍड. अजित काळे


शिर्डी लाईव्ह ( प्रतिनिधी) :-
                                        उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सर्वाधिक काळ याचिका चालून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ४८ वर्षाने उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अजित काळे यांनी तळेगाव दिघे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
                                        निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करून सदर जनहित याचिकेत खंडपीठाने तीन मे रोजी अकोलेतील ० ते २८ कि. मी.चे काम चालू करण्याचे आदेश दिल्याने व त्याचे काम मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरु झाल्याने या याचिकेत महत्वाची भूमिका निभावणारे वकील अजित काळे यांचा कृती समितीच्या वतीने काल तळेगाव दिघे येथे माहेर मंगल कार्यालयात वाल्मीचे  प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार समारंभ व कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले हे होते.
                                        सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष विजय सपकाळ, वकील श्री देशमुख, दर्शन पोखरकर, पाहुणे पाटील, श्री कोरडे, बाळासाहेब पवार, श्री तारडे, तांदळे, अभिषेक हजारे, विजय पाटील, दत्ता पाटील, श्री वाकलेकर, संघटक नानासाहेब गाढवे, जेष्ठ नेते विजयचंद काले, शकुंतला काले, जयेंद्र काले, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, सचिव बाबासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव पोकळे, माजी उपाध्यक्ष रमेश दिघे, गंगाधर रहाणे, कौसर सय्यद, अशोक गांडूळे, सोन्याबापू उऱ्हे सर, ज्ञानदेव शिंदे गुरुजी, तानाजी शिंदे, चंद्रकांत कार्ले, उत्तमराव जोंधळे, नवनाथ मोटे, विठ्ठलराव देशमुख, संदेश देशमुख, आबासाहेब देशमुख, नामदेव दिघे, भाऊसाहेब विलास गुळवे, बाळासाहेब शेळके, डी. एम.चौधरी, दिलीप खालकर, बाळासाहेब सोनवणे, कैलास गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, श्री ढमाले सर,शिवनाथ आहेर, विश्वनाथ थोरात, आदी प्रमुख मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
                              त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, निळवंडेचा लढा लढणे एवढे सोपे नव्हते, न्यायव्यवस्था पुराव्यावर चालते तेथे भावनेला मुळीच स्थान नसते. त्या बाबतीत पत्रकार नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी माहिती अधिकारात आम्हाला भरपूर पुरावे दिले.याआधीही न्यायिक अडचणी होत्या पूर्वीचे न्यायालयाचे आदेश बदलणे सोपे नसते. व ती प्रक्रिया पार करणे ही बाब अवघड होती मात्र पुरावे सक्षम असल्याने या बाबत न्यायालयाचे समाधान करता आले या प्रकल्पात पडद्याडचे हितशत्रू जास्त होते. त्यामुळे लढाई जोखमीची होती.जवळपास दोन डझनभर वकील विरुद्ध होते.मात्र या प्रकरणी निवडक पुरावे कामी आले.व अकोलेतील बंद केलेले कालवे सुरु करण्याचे आदेश ३ मे रोजी न्यायालयाने दिले.७.९३ कोटींचा प्रकल्प २३६९ कोटींवर गेला होता.या बाबत तर आपण अखेर सी.बी.आय.चौकशी साठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा निर्णयाप्रत आलो होतो याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. शिर्डी कोपरगावला पाणी कमी नसताना पाणी मागितले गेले. मात्र त्यांची जलसंपदाकडे मागणीच नव्हती असे सांगून आगामी काळातही आपण कालवा कृती समितीच्या पाठीमागे ठाम उभे राहू असे आश्वासन दिले.
                              सदर प्रसंगी जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी पाणी हि मोठी संपत्ती आहे. त्यावरून आत्ताच लढाया चालू झाल्या आहेत. या पुढे निळवंडेचे पाणी वापरण्यासाठी सहकारी पाणी वाटप संस्था स्थापन कराव्या सुक्ष्म सिंचनयोजना राबवाव्या लागतील असा सावधानतेचा इशारा दिला.व महाराष्ट्र जल संपत्ती प्राधिकरण २००५ चा समन्यायी कायदा यांचा अभ्यास करावा लागेल. आता न्यायालये या संस्थांकडे पाठवत असल्याने आधी या संस्थांकडे न्याय मागावा लागेल.शेतकऱ्यांना शिबिरे आयोजित करवून पाणी वापराचे प्रशिक्षण द्यावे लागेल असेही शेवटी सांगितले.
                           सदर प्रसंगी कालवा कृती समितीच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी यांचाही सत्कार व सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांचा सत्कार अड.शाम डांगे यांनी स्वीकारला.
                            सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनीं केले.उपस्थितांना रुपेंद्र काले, विजय सपकाळ, मच्छीन्द्र दिघे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब रहाणे व गंगाधर रहाणे यांनी केले उपस्थितांचे आभार रमेश दिघे यांनी मानले.