Friday 27 July 2018

लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांचे स्वातंत्र्य अबादित रहावे- ना. सौ. शालिनीताई विखे ; कोपरगाव येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा




लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांचे स्वातंत्र्य अबादित रहावे- ना. सौ. शालिनीताई विखे ; कोपरगाव येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा 
शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी)-
लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील वस्तुस्थिती मांडण्याचे पत्रकारांचे स्वातंत्र्य अबादित रहावे, असे मत जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे यांनी व्यक्त केले. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सार्वमचे संपादक अनंत पाटील यांना राज्यस्तरीय आर्दश पत्रकारीता तर पुण्यनगरीचे संस्थापक बाबा शिंगोटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्यात सौ. विखे बोलत होत्या.

कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव व राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.  मान्यवरांच्या हस्ते दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांना आदर्श पत्रकरिता पुरस्काराने तर पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. व्यासपीठावर पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दूधचे अध्यक्ष राजेश परजणे, लोकमंथनचे संस्थापक संपादक अशोक सोनवणे, सभापती अनुसया होण, यशवंत पवार, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे आदि  उपस्थित होते.
यावेळी ना. सौ. विखे म्हणाल्या, शेतकरी कुटुंबातील चौथी शिकलेले मुरलीधर बाबा शिंगोटे यांचा जीवनप्रवास धक्क करणारा आहे. एक मराठी माणूस पेपर वाटता वाटता स्वतःच वर्तमान पत्र सुरू करतो, अन राज्यभर तो नावा रूपाला येतो. ही साधी गोष्ट नाही. यामागे मेहनत व अपार कष्ट आहेत. सार्वमतचे संपादक अनंत पाटील अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. एरवी संपादकांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घ्यावी लागते मात्र अनंत पाटील हे सर्व सामन्यांसाठी नेहमीच उपलब्ध असतात. यातूनच त्यांचे वेगळेपण दिसून येते. ग्रामीण पत्रकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. महिलांचे, शेतकर्‍यांचे, तळागाळातील सर्वसामान्यांचे निगडीत प्रश्‍न त्यांच्या समस्या मांडण्याचे काम पत्रकार करत असतातच मात्र राजकीय पुढार्‍यांचा मी पणा व त्रुटी दाखविण्याचे काम वेळोवेळी पत्रकार करत असतात. कोणावरही अन्याय न करता पत्रकारांनी आपले काम करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सार्वमताचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी सार्वमतला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे वर्तमान पत्रावरील विश्‍वास टिकून आहे. अभ्यासपुर्ण माहिती मिळवुन ते वाचकांना उपलब्ध करून देत असल्याने सार्वमत वाचकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पत्रकारांच्या लिखाणाचा जनमानसावर चांगला/ वाईट परिणाम होतो.  पत्रकारांचे लिखाण समाजाच्या हिताचे असले पाहिजे. काळाप्रमाणे समस्या निर्माण होत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे. सरकारला जागृत ठेवण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यातून आम्हालाही खुप शिकायला मिळते. ग्रामीण भागातील समस्या पत्रकार मांडत असतात. अजूनही ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागाला पत्रकारितेतून न्याय देण्याचे काम ग्रामीण पत्रकारांनी करावे. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही वृत्तपत्रांची विश्‍वासहर्यता टिकून आहे. विधानसभा व लोकसभेची संसद ठराविक वेळेतच चालू असते परंतु पत्रकारांची जनसंसद कायम स्वरूपी चालू असते.याचा उपयोग पत्रकार विविध समाज घटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच अन्यायाविरूध्द आवाज उठविण्यासाठी करत असतात. कोपरगाव तालुका पत्रकार भवनासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रस्ताव पाठवा तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अश्‍वासन त्यांनी दिले.

सत्कारमुर्ती अनंत पाटील म्हणाले, समाजातला कचरा स्वच्छ करण्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी करण्याचे काम पत्रकार करतात. मोठे स्वप्न ठेवले की, संशय येतो. परतू छोटेसे काम चांगले केले पाहिजे. आपले भवितव्य ग्रामीण भाग व संरचना याच्यावर अवलंबून आहे. नवनवीन घडवण्याचे काम होताना दिसत नाही. नवीन संकल्पनांना जन्म घालण्यासाठी आपले शब्द, कौशल्य, पत्रकारिता पणाला लावावी लागेल. आपण एका टप्यावर पोचल्यानंतर काय काम केले याचा विचार करायला हवा. जुने सोबत घेऊन नवीन काहीतरी करावे लागेल. नवा रोजगार, नवीन निर्मितीची गरज आहे. समाजातील सर्व वेगवेगळ्या विचार प्रवाहांचा विचार करून एक प्रवाह निर्माण केला पाहिजे. पुढील पन्नास वर्षांसाठी उत्तम काय आहे हे पाहून नियोजन करणे गरजेचे आहे. यात राजकारणाचा काहीही संबंध नाही. अशी स्थित्यंतरे नेहमी येत असतात. आधीच्या संघर्षाचे परिणाम भविष्य काळासाठी चांगलेच असतील.

दैनिक पुण्य नगरीचे संस्थापक संपादक मुरलीधरबाबा शिंगोटे यांचा पुरस्कार त्यांच्या वतीने दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक विकास अंत्रे यांनी स्विकारला. ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीला त्याचे कार्य पाहून पुरस्कार दिला जातो.पुण्यनगरीचे संस्थापक बाबांचे काम निस्पृह आहे. त्यामुळे पुरस्कराची उंची वाढली आहे. या पुरस्कारामुळे पुण्यनगरी समूहाला बळ मिळाले आहे.

दैनिक लोकमंथनचे संस्थापक संपादक अशोक सोनवणे म्हणाले, ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे  रक्षण करत असतात त्याचप्रमाणे आमचे पत्रकार समाजामध्ये बारीक गोष्टींवर लक्ष ठेऊन समाजाच्या व्यथा मांडत असतात. कोपरगाव तालुका पत्रकार संघाला पत्रकार भवनासाठी जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राजेश परजणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पत्रकारिता हा चौथा स्तंभ नव्हे मुख्य स्तंभ आहे. सरकारने दुध दरात पाच रुपयांनी वाढ केली त्याबद्दल शासनाचे आभार. सरकारने शेतकर्‍यांना नागविण्याचे काम करू नये. याबाबद पत्रकारांनी जागृती करावी.

नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंतराव पवार म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला. परंतु केंद्र सरकारने त्रुटी असल्याने तो परत पाठवला आहे. पत्रकारांसाठी पंधरा कोटीचा निधी शासनाने आरक्षित केला. परंतु तो पुरेसा नाही तसेच माहिती व जनसंपर्क खाते छोट्या छोट्या दैनिकांना अनियमितता असल्याने नोटीसा पाठवत आहे. ही दैनिके बंद पडली तर ते रस्त्यावर येतील. अधिकार्‍यांनी हे बंद करावे.
यावेळी देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड व कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आनंदवाडी येथील पूरग्रस्तांच्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.

पुरस्कार्थींना दिलेल्या सन्मान पत्राचे लेखन व वाचन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले.

यावेळी साकरवाडी येथील सोमैया विद्यामंदिरच्या प्राचार्या सुनिता पारे यांच्या सहकार्याने संगीत शिक्षक योगीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भागाजी वरखडे, नानासाहेब शेळके, शैलेश शिंदे, युसुफ रंगरेज, संतोष जाधव, सिद्धार्थ मेहेरखांब, सोमनाथ सोनपसारे, सचिन धर्मापुरीकर, रफिक रंगरेज, लक्ष्मण वावरे, रोहित टेके, प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. एस आर बखळे, लक्ष्मण जावळे, गोरक्षनाथ वर्पे, विजय शेळके, जनार्दन जगताप, फकीरा टेके, शिवाजी जाधव, संतोष देशमुख, नितीन जाधव, अक्षय खरात, दिलीप दुशिंग, हाफिज शेख, संजय लाड, योगेश डोखे, निवृत्ती शिंदे, पुंडलिक नवघरे, काकासाहेब खर्डे, मोबीन खान, राजेंद्र गाडे, संजय भवर, हेमचंद्र भवर, दत्तात्रय गायकवाड, अक्षय काळे, किरण नाईक, श्रीकांत नरोडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भागा वरखडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी तर आभार रोहित टेके यांनी मानले


Thursday 26 July 2018

रांजणगाव देशमुख येथे चिमुकल्यांची वारी ; इंग्लिश मिडीयम व जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग



शिर्डी लाइव्ह(प्रतिनिधी):- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी व साई फौंडेशनच्या साई इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढत ग्रामस्तांना पंढरपूर वारीचे दर्शन घडवले.
सोमवारी साई फौंडेशनच्या साई इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांनी तर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी संतांच्या भूमिका साकारल्या होत्या तर अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केली होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा गजर करत मुलांनी गावातील वातावरण भक्तिमय केले होते. गावातील कुटुंबांनी ठीकठिकाणी दिंडीचे स्वागत केले. दिंडीमध्ये मुलींनी डोक्यावर कलश घेतले होते. यावेळी जिल्हा परिषद शाळा रांजणगाव देशमुख चे मुख्याध्यापक राजेंद्र कुळधरण, शिक्षिका संगीता उनवणे, सुरेखा उगले, शीतल ढूस, छाया खर्डे तर साई इंग्लिश मिडीयम चे अध्यक्ष संजय गोर्डे, सचिव उषा गोर्डे, श्रद्धा गोरे, देशमुख, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, गणेश विघे, नंदू बिडवे, बाळासाहेब बिडवे, हरिभाऊ सहाणे, नवनाथ वर्पे, नारायण उदावंत यांच्याबरोबर ग्रामस्त मोठ्या संख्येने हजर होते.

Wednesday 18 July 2018

अटल विश्वकर्मा योजनेची सुरुवात कोपरगाव मधून ; आ. कोल्हे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कामगार नोंदणीचे आवाहन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागा कडून राबवण्यात आलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामगारांची नोंदणी करण्यात आली. या अभियानाची सुरुवात जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातून प्रथम करण्यात आली. नोंदणी केलेल्या कामगारांना आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पाच हजार रुपयांचा धनादेश व कामगारांच्या मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या या मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना रावबिल्या जातात. मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे १८ ते ६० या वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांच्या नावनोंदणी करिता मंडळातर्फे दि ४ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात आले.
यावेळी कोपरगाव तालुक्यात आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नोंदणी केलेल्या कामगारांना पाच हजार रुपयांचा धनादेश व कामगारांच्या मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी नाशिकचे कामगार अधिकारी श्री. जाधव, अहमदनगर चे कामगार अधिकारी श्री. सादिक, भाजपचे तालुका अध्यक्ष शरद थोरात, कोपरगाव चे कामगार अधिकारी मेंगाणे, कोपरगाव बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, उपाध्यक्ष सादिक पठाण, सचिव सुधाकर क्षीरसागर. खजिनदार शब्बीर शेख, हरिभाऊ लोहाकणे, सोमेश कायस्थ, नारायण गवळी आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- अटल विश्वकर्मा योजनेंतर्गत कामगार नोंदणी अभियानाची सुरुवात जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात प्रथम झाली. यावेळी नोंदणी केलेल्या कामगारांना पाच हजार रुपयांचा धनादेश व त्यांच्या मुलांना पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. )

कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर अपघात ; अरुंद रस्त्यामुळे झाला अपघात


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर शहापूर फाटा येथे समोरील गाडीचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून मालवाहतूक ट्रक पलटी होऊन गाडीतील मालाचे व गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालकाला पाठीला किरकोळ झालेली दुखापत वगळता सुदैवाने कुठलीही मोठी दुखापत व जीवित हानी झाली नाही.

कोपरगाव संगमनेर रस्ता अरुंद असल्याने व या रस्त्याला साइडपट्टा नसल्याने या रस्त्यावर कायमच अपघात होत असतात. दि. १६ जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास एच आर ५८ बी ७३४३ ही मालवाहतूक ट्रक कोपरगाव कडून संगमनेर कडे जात असताना शहापूर फाट्यावर आली असता समोरील गाडीचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी गाडीचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चालक व क्लीनरला बाहेर काढले. चालकाला पाठीला किरकोळ झालेली दुखापत वगळता सुदैवाने कुठलीही मोठी दुखापत व जीवित हानी झाली नाही. ही गाडी प्लायवूड घेऊन जात होती अपघातामध्ये ता मालाचे नुकसान झाले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असल्याने चौपदरी होणे गरजेचे आहे.

Wednesday 11 July 2018

रांजणगाव देशमुख येथे खरीप पीक विमा कार्यशाळा ; तज्ञांचे मार्गदर्शन ; शेतकऱ्यांची उपस्थिती



रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मंडळामध्ये रांजणगाव देशमुख येथे खरीप पीक विमा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी ए वाय आढाव यांनी पीक विमा बाबद मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स चे भोकरे, मंडळ कृषी अधिकारी फिरोदिया, कृषी पर्यवेक्षक भोसले , घनकुटे व कृषी सहाय्यक किरण शिंदे, घारकर एस डी, सरपंच संदीप रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी आढाव यांनी हवामान आधारित फळ पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आपत्ती मधील विमा याबाबाद शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विमा भरताना शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचा १५ अंकी खाते नंबर व आय एफ एस सी कोड द्यावा, तसेच शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी नानासाहेब खालकर, भाऊसाहेब देशमुख, शिवाजी वामन, विकास वर्पे, विजय उदावंत, इंद्रभान गोर्डे, सुनील पुंजा खालकर, बाबासाहेब खालकर, नितीन गोर्डे, भाऊसाहेब पवार, हरिभाऊ गुडघे, गोरक्ष शिंदे, बाबासाहेब देशमुख, राजेंद्र शेटे, सोमनाथ वर्पे, बाबासाहेब खालकर, विलास रणधीर, विक्रम ठोंबरे, रामनाथ सहाणे, अर्जुन वेताळ, वीरेंद्र वर्पे, अशोक ठोंबरे तसेच रांजणगाव देशमुख, मनेगाव, मल्हारवाडी, काकडी, अंजनापूर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रांजणगाव देशमुख येथे भीषण पाणी टंचाई ; उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडून उद्भव विहिरीची पाहणी


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
३० जून रोजी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख व अंजनापूर येथील शासनाकडून सुरु असलेले पाण्याचे टँकर बंद केल्याने गावात पाण्याची मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकर बंद केल्यामुळे गावात पाण्याची कशी परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी रांजणगाव देशमुख येथे भेट देऊन उद्भव विहीर व धोंडेवाडी येथील ६ गाव पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पुरवठा विभागातील श्री सोनार, मंडल अधिकारी जेडगुले, तलाठी गणेश कांगणे, ग्रामविकास अधिकारी पांडे, सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, सुखदेव खालकर, भाऊसाहेब देशमुख आदि मान्यवर हजर होते.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख सह परिसरातील गावे कायमच अवर्षण प्रवण मध्ये असून येथे पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. यंदाच्या वर्षीही पुरेसा पाऊस झाला नसून सध्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी रांजणगाव देशमुख येथे १० मे २०१८ रोजी टँकर सुरु झाला आणि ३० जून २०१८ रोजी टँकर बंद झाल्याने रांजणगाव देशमुख मध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

या परिस्थितीमुळे उद्भव विहीर व पाण्याची गावातील परिस्थिती पाहण्यासाठी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्तांनी त्यांचे स्वागत करून गावातील पाणी टंचाईची परिस्थिती सांगितली आणि टँकर सुरु करण्याची विनंती केली. तसेच धोंडेवाडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६ गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावाचीही पाहणी केली. अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी निचित यांनी सांगितले. यावेळी अमर बोगा, मैड, शिवाजी वामन, सुभाष दुशिंग, प्रकाश गोर्डे, तुषार काथे, ज्ञानेश्वर खालकर, विकास वर्पे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.


(फोटो ओळी- रांजणगाव देशमुख ता. कोपरगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाहणी करताना उपजिल्हाधिकारी संदीप निचित, मंडल अधिकारी जेडगुले, तलाठी कांगणे आदि. छाया- गोरक्षनाथ वर्पे)

लहान मुलांना स्वप्न द्यायला हवे- डॉ. गिरीश कुलकर्णी ; अंजनापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम, ६५१ वृक्षांची लागवड ; 'वृक्षवेध फाउंडेशन' चा प्रेरणादायी उपक्रम


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-

लहान मुलांना आपण स्वप्न द्यायला हवे त्याने त्यांचा विकास होतो आणि पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल होते आणि गावही आदर्श होते असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.

ते कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे तीन दिवसापासून सुरु असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव गडाख, नेवासा तालुक्यातील गोगलगाव चे सरपंच योगेश म्हस्के, वडगाव चे सरपंच वाबळे, एच डी एफ सी बँक व कृषिविकास संस्थेच्या रेखा चिकणे, जीवन खरात, रोहित बिडवे, नानासाहेब गव्हाणे, प्रल्हाद गाडे, बापूसाहेब गव्हाणे, संदीप गाडे, बाबासाहेब गव्हाणे, आदि मान्यवर उपस्थित होते.

अंजनापूर येथे वृक्षवेध फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली असून या फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून मोठ्या प्रमानात वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षी ६५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले असून त्यांना सुरक्षा जाळीही लावण्यात आली आहे. त्यामुळे एकूण लागवड केलेल्या झाडांची संख्या २०२३ झाली आहे.

डॉ. गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले की, १० वर्षानंतर या गावाचे स्वरूप खूप वेगळे राहील. त्याचे एक स्वप्न चित्र आपण एका भिंतीवर रेखाटले पाहिजे आणि त्यावर काम केले पाहिजे.

तसेच जयवंत गडाख आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अंजनापूर गावाचे काम वाखाणण्याजोगे आहे पुढील काही वर्षात देश पातळीवर याची नोंद होईल. आणि राळेगण सिद्धी व हिवरे बाजार प्रमाणे लोक आपल्याकडे प्रेरणा घेण्यासाठी येतील.

सदर प्रसंगी वर्षभर गावातील युवक झाडांची निगा राखतात त्यांची काळजी घेतात अशा युवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जयवंत गडाख, योगेश म्हस्के, बापूसाहेब गव्हाणे, संदीप गाढे, रामदास गव्हाणे, सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी गावातील ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब रहाणे यांनी आपल्या विशेष वत्कृत्व शैलीतून केले तर आभार कैलास गव्हाणे यांनी मानले.

(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे तीन दिवस सुरु असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा समारोप डॉ. गिरीश कुलकर्णी व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी युवकांचा सन्मान करण्यात आला. छाया- विकास गोर्डे)

शिंगोटे यांना राज्यस्तरीय पत्रकारीता जिवनगौरव पुरस्कार तर पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार



कोपरगाव(प्रतिनिधी):-

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारीता जिवनगौरव पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधरबाबा शिंगोटे यांना तर राज्यस्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील यांना दिला जाणार असल्याची माहीती कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॅा अरुण गव्हाणे यांनी दिली आहे.

राज्याचे विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखेपाटील यांचे शुभहस्ते तर आ.स्नेहलता कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा येथे २५ जुलै २०१८ रोजी कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता पार पडणार आहे.

यावेळी संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कर्मविर काळे कारखान्याचे अध्य़क्ष आशुतोष काळे ,प्रियदर्शनी महीला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, संजिवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, औद्योगीक वसाहतीचे अध्य़क्ष विवेक कोल्हे, जिल्हा बॅंकेच्या संचालीका चैताली काळे, पदमकांत कुदळे आदि प्रमुख पाहुणे म्हणुन तर विविध पदाधिकारी, आधिकारी व पत्रकार उपस्थीत राहणार आहे.

अनंत पाटील व मुरलीधर शिंगोटे यांचे पत्रकारीता क्षेत्रातील असलेल्या कामाची दखल घेउन पत्रकारीता पुरस्कर निवड समितीने त्यांच्या नावाची घोषणा केला आहे.

यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिंदे, कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, सचिव संतोष जाधव, खजिनदार सिद्धार्थ मेहरखांब, संघटक दिलीप दुशिंग, भागा वरखडे, सचिन धर्मापुरीकर, रोहीत टेके, नानासाहेब शेळके, प्रा साहेबराव दवंगे, सोमनाथ सोनपसारे, संतोष देशमुख, किरण नाईक, प्रा.डॅा.एस.आर बखळे, लक्ष्मण जावळे, लक्ष्मण वावरे, गोरक्षनाथ वर्पे, शिवाजी जाधव ,अक्षय खरात ,नितीन जाधव, विजय शेळके, राजेंद्र गाडे, निवृत्ती शिंदे, हेमचंद्र भवर, दतात्रय गायकवाड, रफिक रंगरेज, पुंडलीक नवघरे, फकिर टेके, जगताप, योगेश डोखे, मोबीन खान, हाफीज शेख, काकासाहेब खर्डे, संजय भवर आदि पत्रकार यावेळी उपस्थीत होते.

Wednesday 4 July 2018

विद्यार्थ्यांचे ध्येय मोठे असावे- शिवाजी रहाणे ; बहाद्दरपूर येथे गुणवंतांचा सत्कार ; २८ वर्षांपासून सुरु असलेला उपक्रम



रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
विद्यार्थ्यांचे ध्येय मोठे असावे प्रत्येकाने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न ठेवावे व विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन शिवसेनेचे मलबार मुंबईचे उपविभाग प्रमुख शिवाजी रहाणे यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील श्री.छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठान व बहादरपूर ग्रामस्त आयोजित २८ व्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मोफत वह्या वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.
बालउत्साही मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने कै. दशरथ रहाणे त्यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या या गुणगौरव व वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमात दरवर्षी विद्यार्थ्यांना विनामूल्य वह्यांचे वाटप, विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते रामदास रहाणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुबई दक्षिण शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी राजे रहाणे होते. तसेच कोपरगावचे शिवसेनेचे नेते राजाभाऊ झावरे, नितिन औताडे, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब सावळेराम रहाणे, उद्योजक संदीप गाढे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, जयंवत गडाख, वेसचे प्रथम लोकनियुक्त सरपंच माणिकराव दिघे, मिंनानाथ हेंगडे, शिवसेना युवा नेते सागर आण्णा रहाणे, जयवंत भुईटे, अंजनापूरचे सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, प्रकाश खामकर, लक्ष्मण दादा थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी रहाणे पुढे म्हणाले की, राजकारणातून १०० टक्के समाजसेवा करत असून गेल्या २८ वर्षांपासून या कार्यक्रमासाठी ग्रामस्तांनीही भरपूर सहकार्य केले आहे.
या वेळी विशेष नैपुण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्याक्रामाच्या वेळी साईनाथ रहाणे, विलास पाडेकर, भाऊसाहेब शिंदे, भास्कर महाराज गव्हाणे, मिंनानाथ जोंधळे, आर.टी.वो अधिकारी प्रविण रहाणे, विक्रीकर आयुक्त सागर जोंधळे, बाळासाहेब चिमणराव रहाणे, गंगाधर रहाणे, माजी सरपंच कैलास रहाणे, आदी प्रमुख मान्यवर तसेच ग्रामस्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत रहाणे व महेश रहाणे तर आभार रामदास रहाणे यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवर. छाया- विकास गोर्डे