Tuesday 17 May 2016

सामाजीक एकता म्हणजे काला- वावीकर महाराज 
बहादरपूर येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता 

रांजणगाव देशमुख(वार्ताहर):- 
                                   भगवंत प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे प्रसाद देतो. तसेच तो आपल्याबरोबर राहून आपल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतो. काला म्हणजे सर्वधर्म समभाव व सामाजिक एकता व अखंडता  होय असे प्रतिपादन हभप पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांनी केले. 
                                   कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे सुरु असलेल्या श्री संत सदगुरु गोपाजीबाबांच्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहाची दि. ४ मी रोजी सांगता झाली यावेळी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. यावेळी सामाजिक , राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. वावीकर महाराज पुढे म्हणाले की, आपल्याला देव अजून कळलेला नाही. आपल्या मनोभूमिकेला परमात्मा कळला तर सोन्याला सुगंध येईल. विचारशून्य माणसे देव जाणू शकत नाही. आपण समाजाला तसा मर्यादित देव नाही. देव  सर्वव्यापी व सर्वज्ञ आहे. देवाकडे जाताना अंतरीचा व बाहेरचा भाव सारखाच असावा. कंसाने महाबळ दैत्याला व पुतना मावशीला कृष्णाला मारण्यासाठी पाठवले त्यांचा अंतरीचा भाव चांगला नसल्याने भगवान श्रीकृष्णाने त्याना मारले. सामाजिक एकता व अखंडता म्हणजे काला. सर्वांनी एकत्र येउन विकाच्या दृष्टीने काम करणे म्हणजेच काला होय. 
                                    सप्ताहाचे नियोजन अगदी उत्कुष्ट प्रकारे करण्यात आले होते. सप्ताह काळात  हभप महाराज उखळीकर यांच्या वाणीतून भागवताचे श्रवण भाविकांनी केले. हभप बबन महाराज गाडेकर यांच्या वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. दररोज विविध ८ ते १० गावे सप्ताह स्थळी भाकरी घेऊन येत. सकाळी व सायंकाळी आमटी भाकरीच्या पंगतीचे आयोजन कारण्यात आले होते. सप्ताह काळात २९ एप्रिल रोजी रामगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण झाले.दिवसागणिक भाविकांची गर्दी वाढत होती. दररोज संध्याकाळी सुमारे पाच हजार भाविक कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत होते. सांगतेच्या दिवशी माजी महसुल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, संजीवानाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सभापती सुनील देवकर, कोळपेवाडी कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन रोहमारे, संजीवनीचे उपाध्यक्ष शिवाजी वक्ते, स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीनराव औताडे, अरुण येवले, साईनाथ रोहमारे, सुनील शिंदे, नानासाहेब गव्हाने, मंदिराचे इंजिनियर प्रकाश गव्हाने, दक्षिण मुंबई शिवसेना उपविभाग प्रमुख संजय रहाणे,  आदी मान्यवर उपस्थित होते. तर सप्ताह काळात सिन्नर चे आमदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे, आशुतोष काळे, आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. ग्रामास्तांच्या वतीने सप्ताहास सहकार्य केलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यात आले. 
 

 

फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे संपन्न झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या काल्याचे कीर्तनाचे पुष्प गुंफताना हभप पांडुरंग महारज गिरी व समोर उपस्थीत असलेले प्रचंड भाविक. तर दुसर्या छायाचित्रात सकाळी काढण्यात ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले भाविक. (छाया-विकास गोर्डे)
गुरु प्रसिद्ध असन्यापेक्षा सिद्ध असावा - उमेश महाराज दशरथे  
रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                        भक्ती नाही करता आली तरी चालेल मात्र नको त्याला संत किंवा देव म्हटल्यामुळे जीवनात जास्त नुकसान होते आपला गुरु सिध्द असल्यापेक्षा प्रसिध्द आहे का हे बघण्याकडेच आज समाजाचा कल दिसतो पण गुरु प्रसिद्ध असण्यापेक्षा सिद्ध असावा असे प्रतिपादन हभप उमेश महाराज दशरथे यांनी केले. 
                        कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे सुरु असलेल्या श्री संत सदगुरु गोपाजीबाबांच्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहाचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.यावेळी  भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, किर्तनकेसरी पांडुरंगगिरी महाराज वावीकर, वैराग्यमुर्ती बबन महाराज गाडेकर, रामप्रभु महाराज आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. .गेल्या सात दिवसापासुन सुरु असलेल्या भागवत कथेला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असुन उखळीकर महारांजानी भाविकांना भक्तीरसात न्हाउ घातले. सर्व भाविक नाचु ,गाउ लागले.अनेकांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. श्रीकृष्णाचे जीवन चरीत्र अत्यंत रसाळ वाणीतुन सादर केले.
                         दशरथे महाराज पुढे म्हणाले कि, जगातील निराभिमानी लोक देवाला आवडतात. देवाचे चिंतन सदैव करणारांचा योग-क्षेम भगवंत वाहतो. अनन्य भावाने शरण गेल्यानंतर त्याचे जीवन निश्चित सफल होते. भक्ताने देवावरची आपली आवड फक्त शब्दात व्यक्त करु नये ती कृतीमध्ये आणावी. मार्गदर्शक आणि अंमलबजावणी करणारे यांचा समन्वय सुंदर असला की कार्य संदर होते.संत परमेश्वराची ओळख सामान्य माणसाला लक्षणे,चरीत्र आणि महिमा यावरुन  करुन देतात. देवाच्या दर्शनापेक्षा त्याची ओळख होणे गरजेचे आहे. दुर्योधनाला देवाचे दर्शन सतत झाले मात्र ओळख झाली नाही. देवाचे चरीत्र आनंद देते तर संताचे चरित्र अनुभव देते. देवाचा स्नेह होण्यापेक्षा कृपा व्हावी .परमेश्वराची कृपा अंडज, जरज,स्वेदज, उदबीज या सर्वांवर झालेली आहे. जीवनात वाट लावणारे भेटतात मात्र वाटेला लावणारे थोडे भेटतात. असेही त्यनी सांगितले. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. 



फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे सुरु असलेल्या  अखंड हरीनाम सप्ताहाचे सहावे पुष्प गुंफतांना उमेश महाराज दशरथे व समोर उपस्थीत असलेले प्रचंड भाविक. (छाया-विकास गोर्डे)
संस्कृती रक्षणाची जबाबदारी तरुणांची- हभप जळकेकर महाराज 
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):- 
                                    जीवनात मोक्ष ही अध्यात्माची परमोच्च पातळी  असली तरी संतामंडळीना मोक्षप्राप्ती कठीण वाटत नसून त्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावेच लागत नाही  पर्यावरण, धर्म, संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुणांची आहे असे प्रतिपादन खानदेशरत्न हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी व्यक्त केला. 
                                    ते कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बहादरपूर येथील गोपाजी बाबा सुवर्ण महोत्सवी साप्ताहाचे ५ वे पुष्प गुंफताना बोलत होते. महाराज पुढे म्हणाले की जीवनात पत्नीला पैशाने, मित्राला सत्यावाचानाने, पुत्राला प्रेमाने आणि मोक्षाला ज्ञानाने आपलेसे करावे. परमेश्वर सोडून संसार केवळ येरझार आहे. माणसाच्या वृत्तीवाराचे अज्ञानाचे आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान मिळत नाही. परीसाप्रमाने संतसंगीताने माणसाच्या जीवनाचे सोने होते. संताना मोक्षापेक्षाही भक्तिरस अधिक प्रिय आहे. महाराजांनी अनेक सामाजिक अनिष्ठ चालीरीती विरुद्ध आपल्या परखड वाणीतून प्रबोधन केले. पर्यावरण, धर्म, संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुणांची आहे. हिंदुस्तान अखंड रहावा यासाठी विघातक प्रवृत्तींना वेळीच रोखा आणि भारत माता की जय हा मंत्र घराघरात पोहोचवा. हिंदुस्तानात राहायचे असेल तर हिंदूंचे एकावेच लागेल आणि भारत मातेचा आदर करावाच लागेल असेही त्यांनी सांगितले. 
                              
     कीर्तनाचे चौथे पुष्प गुंफताना हभप ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी सांगितले की. पिंपळनेर निवासी प्रसिध्द संत निळोबाराय यांनी निज भक्ताची आवडी,संभाळीत घडी घडी  राखुनिया भुक तहान,करी त्यांचा  बहुमान या आपल्या अभंगातून भगवतांची आवडड व्यक्त केली आहे.या अभंगाचे निरूपण करतांना ज्या माणसात जो उत्कृष्ट गुण आहे त्या गुणाने आपण देवाची भक्ती करून देवाचा प्रिय होऊ शकतो. किर्तनकार आणि कालाकार जर एकत्र आले तर तत्वज्ञानाचे व्यासपीठ निर्माण होऊ शकते. अहमदननगर जिल्हयात ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली असल्याने जिल्हा भाग्यवान आहे. कोणालाही ठिकाणाची ओळख प्रसिध्द व्यक्तीमत्वामुळे होत असते. रणागगंण गाजणारा अनेक महिने तलवारीला धार लाववतो म्हणून तलवारही त्याला साथ करते. समाजाला आत्मसुखाची कल्पना नाही विषयांचे अंतरंग माहित नाही पण संत  विषयांचा त्याग करतात आणि विषयतो त्यांचा झाला नारायण या रितीने जीवन जगतात. 
व्यासपिठावर पाडुंरंग महारज वावीकर, बबन महाराज गाडेकर, बबन महाराज गव्हाणे, रामप्रभु महाराज आदि उपस्थित होते. सप्ताहास दिवसागणिक भाविकांची उपस्थिती वाढत आहे. 


 






(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे कीर्तनाचे पाचवे पुष्प गुंफताना हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व समोर उपस्थितीत भाविक. छाया-  विकास गोर्डे)
बहादरपूर हे बेटाशी निष्ठा असणारे गाव- महंत रामगिरी 
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                   बहादरपूर हे सरला बेटाशी निष्ठा असणारे  गाव असून गोपाजी बाबा हे महान संत होते. आजचा दिवस सर्वांच्या भाग्याचा आहे असे प्रतिपादन सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले. 
                                    कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे श्री संत सदगुरु गोपाजी बाबांचा सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी हभप मधुकर महाराज, हभप चंद्रकांत सावंत आदि  महाराज उपस्थित होते. रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, तपस्यायुक्त, भगवतमय व त्यागमय बाबांचे जीवन आहे. येथे आल्यानंतर दुष्काळ वाटत नाही परामार्थामुळे दुखाची तीव्रता अन्तकरनापर्यन्त जाणार नाही. अनुकालाता व प्रतिकुलता यामध्ये समानता आणण्याची शक्ती परमार्थात आहे. भगवदचिन्तनाने समाधान प्राप्त होते. याचा आनंद आपणा सर्वांच्या चेहर्यावर दिसत आहे . गोपाजी बाबांनी येथे साधना केलेली आहे. साधनेचे एक वलय असते. बाबांचे संस्कार या ठिकाणी आहे. येथे उर्जा आहे. ती सर्वाना पोषक आहे.येथे भागवत कथा सुरु आहे. भागवत कथा म्हणजे वेदरूपी कल्परुक्षाचे परिपक्व फल आहे. भागावात म्हणजे भाव, ज्ञान, वैराग्य, तप. जीवनरूपी सर्प कालरुपी गरुडाच्या चोचीमध्ये आहे. आणि तो जेव्हा काठारूपी भागिरथिमध्ये डुबकी मारतो तेव्हा तो मुक्त होतो. मंदिराचे काम सुरु झाल्यापासून येथे अनेक वेळा येणे झाले आहे. 
                                  आज सप्ताहाचा तिसरा दिवस असून तीन दिवसापासून सुरु असलेली मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज पूर्ण झाली. दुपारी दोन वाजता रामगिरी महाराजांचे आगमन झाल्यानंतर प्रथम मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर कलशाचे पूजन करण्यात येउन महाराजांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले, कलशारोहण करण्यासाठी ग्रामस्तानी क्रेनची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर हभप गाडेकर महाराज यांच्या हस्ते रामगिरी महाराज यांचे ग्रामस्तांच्या वतीने पूजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त ग्रामस्तांच्या वतीने सर्वाना पुरणपोळी च्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कोसाका चे आशुतोष काळे यांनी सप्ताहास सदिच्छा भेट दिली. 
                                   दुपारी २ ते ५ या वेळेत भागवताचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे निरुपण होत आहे. या भागवत कथेला पहिल्या दिवपासूनच ठीकठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सप्ताह प्रसंगी गावातील रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती, घरावर गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या, गावात येणा-या जाणाराचे जय हरी म्हणुन होणारे स्वागताने संपुर्ण बहादरपुर नगरी मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, सप्ताह काळात सकाळी व संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. भाविकांच्या गाड्यांसाठी प्रशस्त व सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसण्यासाठी सप्ताह मंडप अगदी प्रशस्त असून दुपारी भागवत कथेसाठी Fan ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण गावात विद्यत रोषणाई करण्यात आलेली आहे. भागवत कथेप्रसगी पांडुरंगगिरीजी महाराज वावीकर, स्वामी शिवानंदगीरीजी महाराज, अरविंद महाराज, बबन महाराज गाडेकर, रामप्रभु महाराज आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत असतात. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन बहादरपूर ग्रामस्तानी अत्यंत आधुनिक व अद्ययावत प्रकारे केलेले आहे.





(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे सुरु असलेल्या साप्ताहप्रसंगी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करताना महंत रामगिरी महाराज. छाया- विकास गोर्डे समर्थ फोटो)
बहादरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात 
भागवत कथेसाठी हजारोंची उपस्थिती 

रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                    कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे बुधवार दि.२७ पासून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी ग्रामास्तांमध्ये मोठा उत्साह होता.
                                    कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे बुधवार पासून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी गावातुन नंदी, कासव, पिंड व गोपाजीबांबांची मुर्ती यांची गावातुन सवाद्य मिरवुणुक काढण्यात आली होती.या मिरवणुकित अनेकांनी फुगडी खेळुन आनंद व्यक्त केला. दुपारी मंडप पुजन,संत साहित्य पुजन, कथापवक्ते पुजन होउन भागवत कथेला सुरुवात करण्यात आली. मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस चालणार असून त्यासाठी गावातील जोडपे व पौरोहित्य करण्यासाठी ब्राम्हण आहेत. तसेच श्री संत सदगुरु गोपाजीबाबांच्या बालसंस्कार केंद्राच्या फलकाचे अनावरण स्वामी शिवानंदगीरीजी महाराज यांचे हस्ते करण्यात आले. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. रात्री अमृतदास  महाराज जोशी यांचे हरीकिर्तन झाले.भागवत कथेच्या शुभारंभ प्रसंगी स्वामी शिवानंदगीरीजी महाराज म्हणाले की, संजीवन समाधी घेणारे संत सदगुरु गोपाजीबाबा महान संत होते.भागवत कथा म्हणजे साक्षात भगवंतांचे वाडमय आहे.भागवत कथा श्रवणाने जिवन सफल होते. दुपारी २ ते ५ या वेळेत भागवताचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे निरुपण होत आहे. या भागवत कथेला पहिल्या दिवपासूनच ठीकठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सप्ताह प्रसंगी गावातील रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती, घरावर गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या, गावात येणा-या जाणाराचे जय हरी म्हणुन होणारे स्वागताने संपुर्ण बहादरपुर नगरी मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, सप्ताह काळात सकाळी व संध्याकाळी प्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. भाविकांच्या गाड्यांसाठी प्रशस्त व सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसण्यासाठी सप्ताह मंडप अगदी प्रशस्त असून दुपारी भागवत कथेसाठी Fan ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण गावात विद्यत रोषणाई करण्यात आलेली आहे. भागवत कथेप्रसगी पांडुरंगगिरीजी महाराज वावीकर, स्वामी शिवानंदगीरीजी महाराज, अरविंद महाराज, बबन महाराज गाडेकर, रामप्रभु महाराज आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन बहादरपूर ग्रामस्तानी अत्यंत आधुनिक व अद्ययावत प्रकारे केले आहे.
(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे सप्ताहास सुरुवात झाली रात्री अमृतदास महाराज जोशी यांच्या कीर्तनाप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. चौकटीत अमृतदास महाराज जोशी. छाया- विकास गोर्डे, समर्थ फोटो.)

Thursday 12 May 2016

काकडी गावामध्ये एस टी बस आधी पोहोचले विमान

काकडी गावामध्ये एस टी बस आधी पोहोचले विमान 
दुष्काळाचे संकट भीषण ; पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 
 रांजणगाव देशमुख:-
                             
         अहमदनगर जिल्ह्यातील ज्या गावात दि. २ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता पहिले विमान पोहेचले आणि येत्या काही दिवसात ज्या गावातून प्रवासी घेऊन विमान उड्डान करेल त्या गावात अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाची एस. टी  बस पोहचू शकली नाही. हे वास्तव आहे कोपरगाव तालुक्यातील काकडी या गावाचे एस टी बरोबरच हे गाव सर्वच पायाभूत सुविधांपासून वंचित आहे.
                                  
                                     अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काकडी येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रिय दर्जाच्या विमान तळावरून येत्या काही दिवसात विमान उड्डाण करेल असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे त्या दृष्टीने येथील तयारीही पूर्ण झालेली असून धावपट्टीचे कामही पूर्ण झाले आहे. संरक्षक भिंतीचे कामही प्रगतीपथावर आहे. पण या गावातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या गावामध्ये अजून पर्यंत एस टी बस पोहोचू शकलेली नाही. एस टी बसची सोय नसल्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काकडी हे गाव कोणत्याही मोठ्या रस्त्यावर नसून ते कोपरगाव पासून ३० कि मी, राहाता व शिर्डी शहरापासून १२ कि मी आतमध्ये आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी कोपरगाव- काकडी अशी मुक्कामी बससेवा सुरु होती पण कालांतराने ही बससेवा बंद करण्यात आली. या गावामध्ये अजूनपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी शिर्डी, राहाता येथील खाजगी दवाखाण्यावर वर अवलंबून रहावे लागते.
                                    गावामध्ये पिण्याच्या पाण्याची कोनतीही शाश्वत योजना अजूनपर्यंत शासनाने हाती घेतलेली  नाही. अजूनही येथील नागरिकांना पाण्यासाठी tankar ची प्रतीक्षा करावी लागते. गावामध्ये पाण्याची परिस्थिती भीषण असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्ताना मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. गावात ग्रामपंचायतजवळ एक कुपनलिका असून ती दिवसाआड चालू करण्यात येते. अगदी रात्री ३ वाजेपर्यंत या कुपनलीकेवर पाणी भरण्यासाठी गर्दी असते. सध्या गावासाठी tankar मंजूर झालेला असून पण पाणी भरण्यासाठी कोठे उद्भवच नसल्याने tankar सुरु होणेही अवघड असल्याचे ग्रामविकास अधिकारी जी डी कार्ले यांनी सांगितले. विमानतळाला येनार्या पाण्यातून गावासाठी कायमस्वरुपी पाणी देण्यात यावे व विमानातळावरील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी बाहेर वाहून जाऊ न देता पाइपलाइनद्वारे गावातील तलावात सोडले जावे अशी मागणीही ग्रामस्तानी प्रशासनाकडे  केली आहे.
                                 या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा असून हायस्कुल च्या शाळेला पक्की इमारत नाही. शाळेच्या खोल्यांना भिंतीच्या जागी चटया लावण्यात आलेल्या आहेत. गावात शाळेसाठी पक्या स्वरूपाच्या  १० वर्ग खोल्या बांधून देण्यात याव्या अशी मागणी ग्रामास्तानी केली आहे. गावाकडून तालुक्याला जोडणारे तसेच अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांची कामे झालेली नाही. गावातील  अंतर्गत रस्ते व इतर गावांना जोडणारे सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे व गावातील रस्त्यांवर स्टेटलाईट बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामास्तानी केली आहे. यासंधार्भात सरपंच नानूबाई सोनवणे तसेच ग्रामास्तानी विश्वास पाटील यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्याशी चर्चा केली असता  रत्यासाठी १० कोटी रुपये मंजूर करून हे काम मार्गी लाउ असे अश्वासन दिले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठीही निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक वेळेस प्रशासनाकडून केवळ अश्वसानेच दिली जातात कार्यवाही मात्र होत नाही असेही सरपंच नानुबाई सोनवणे यांनी यावेळी  सांगितले. गावातील स्मशान भूमीला संरक्षक भिंत बांधून अंतर्गत सुविधा करण्यात याव्या तसेच Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणीही ग्रामस्तानी केली आहे.  आत्ताच काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांच्या झालेल्या दौर्याच्या वेळी ग्रामस्तांनी विविध अडचणींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. विमान प्राधिकरणाच्या वतीने गावात फक्त ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयासाठी नवीन इमारत बांधून देण्यात आली आहे.  
                                काकडी गावाची जमीन विमानतळासाठी निश्चीत करून शासनाने येथे शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी विमानतळ बनवले पण येथील शेतकऱ्यांचा विचार केला नाही. येथील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कोण सोडवणार? उद्या या गावातून विमान उड्डाण करेल पण यां गावाच्या पायाभूत सुविधांकडे कोण लक्ष्य देणार हा  प्रश्न येथील नागरिकांना कायमच अनुत्तरीत आहे.
 
  
 काकडी- शिर्डी तीर्थक्षेत्रासाठी होत असलेल्या विमानतळावर दि. २ मार्च रोजी पहिल्या विमानाचे आगमन झाले. या गावात सध्या बस सेवाही सुरु नाही)