Tuesday 23 April 2019

बालसंस्कार केंद्रास गीता परिवाराचे संजयजी मालपाणी यांची सदिच्छा भेट


सहभागी मुलांशी साधला संवाद 
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                          गीता परीवार आयोजित कोपरगाव येथे बाल संस्कार केंद्रामध्ये चालू असलेल्या शिबिरास गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजयजी मालपाणी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रात सहभागी मुलांना गीता अध्याय १२ व १५ यांचे विस्तृत विवेचन केले. तसेच मुलांना विविध प्रसंग सांगून त्या द्वारे  योगा, आहार व प्रणवोच्चार किती महत्वाचे आहेत हे पटवून दिले.
                                          शिबिरातील मुलांना ८ डिसेंबर २०१९ रोजी गीता जयंती निमित्त होणाऱ्या गीता अध्याय १२ व १५ यांचे पठण कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले. आयोजकांना पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्राचे नियुक्त पालक श्री अरुण लढ्ढा व श्री संतोष भट्टड यांनीही संजयजी मालपाणी यांना पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला. शिबिरामध्ये एकूण १२५ विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. १०  दिवस चालू असलेल्या या शिबिरात मुलांना गोष्ट, श्लोक, वारली पेंटिंग, हस्तकला असे विविध प्रकार शिकविले जातात. सदर शिबिर पार  पाडण्यासाठी सौ. विमल राठी, सौ. ममता  डागा , श्रीमती सरिता लाहोटी, चि. आशुतोष  शिवाळ, सौ. जया शिवाळ, श्री. राहुल बजाज, सौ.अर्चना वाणी ,कु. ऐश्वर्या भट्टड  यांच्यासह अनेक नवीन कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सदर कार्यक्रमास. मुकुंद भुतडा, विनोद डागा, सागर लाहोटी यांची उपस्थिती  होती.

बहादरपूरच्या गोपाजीबाबा संजीवन समाधी मंदिरास सागवणी मंदिर अर्पण


कै. सुप्रिया खर्डे हिच्या स्मरणार्थ बहादरपूरच्या गोपाजीबाबा संजीवन समाधी मंदिरास सागवणी मंदिर 
रांजणगाव देशमुख( वार्ताहर):-
तालुक्यातील श्रीक्षेत्र बहादरपूर येथील संत सदगुरू गोपाजी बाबांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण वर्धापनदिनाचे औचित्य साधून 26 एप्रिल रोजी बालब्रम्हचारी अरविंद महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य प पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते व माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असून सकाळी 10 ते 12 या वेळेत किर्तन केसरी हभप पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांचे किर्तन, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तत्पुर्वी सकाळी 6 ते 9 मुर्ती प्राणप्रतिष्ठा होत असून त्यानिमीत्त संवत्सर येथील भाविक भाउसाहेब खर्डे ऊर्फ रामचंद्र गवारे यांनी मुलगी कै. सुप्रिया हिच्या स्मरणार्थ गोपाजीबाबा समाधीस सागवणी मंदिर अर्पण केले आहे.
सदरचे सागवणी मंदिर सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील कारागिर श्री. बाबासाहेब निवृत्ती सोमवंशी यांनी पाच ते सहा सहका-यांच्या मदतींने दोन महिन्यांत तयार केले असून त्याची उंची कळसासह अकरा फुट तर रूंदी आठ फुट आहे.  हे मंदिर बनविण्यांसाठी सुमारे चार लाख रूपये खर्च आलेला आहे.
श्रीक्षेत्र बहादरपुर येथे परिसरातील भाविकांनी तसेच पंचकमिटी गांवक-यांच्या सहकार्यातुन 225 वर्षापुर्वी संजीवन समाधी घेतलेल्या गोपाजीबाबा स्थळाचा विकास करण्यांत आला असून याठिकाणी सुमारे 70 ते 80 लाख रूपये खर्च करून साडेपाच हजार स्क्वेअरफुट जागेवर पाच कळसाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्यांत आले आहे. गोपाजीबाबा यांनी 12 वर्षे तपश्चर्या करून त्यानंतर बहादरपुर येथे संजीवन समाधी घेतलेली आहे.  प्रत्येक वर्षी चैत्र वद्य पंचमीच्यादिवशी याठिकाणी धार्मीक सप्ताहाचे आयोजन केले जाते. गेल्याच वर्षी सुवर्णमहोत्सवी सप्ताह संपन्न झाला.  मंदिर समितीचे प्रमुख किशोर रहाणे व पंच बाळासाहेब रहाणे, कैलास रहाणे, रामदास रहाणे, पुंजाहरी राहणे, रमेश रहाणे तसेच गांवक-यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होत आहे.  दरवर्षी आळंदी, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पुणतांबा आदि ठिकाणी दिंडया काढल्या जातात. महाशिवरात्र व गुरूपौर्णिमा उत्सव येथे मोठया प्रमाणांत साजरे केले जातात.  गोपाजीबाबांच्या संजीवन  समाधी दर्शनांसाठी नोकरीनिमीत्त बाहेरगांवी असलेली मंडळी तसेच शुभविवाह होवुन बाहेर गेलेली मंडळी दर चैत्र वद्य पंचमीला येथील सप्ताहाला आर्वजुन दर्शंनासाठी हजेरी लावतात. श्रावणाच्या तिस-या सोमवारी गोपाजीबाबांची यात्रा भरते.  संजीवन समाधी गोपाजीबाबांच्या दर्शंनाने असंख्य भक्तांवर कृपादृष्टी झालेली आहे. गोपाजीबाबा हे महादेवाचे भक्त होते तर कै. सुप्रिया भाउसाहेब खर्डे या भगिनी गोपाजीबाबांच्या भक्त होत्या. त्यांच्यावर गोपाजीबाबा, दावलमलिक व कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कृपादृष्टी होती.  त्यांच्या निधनानंतर कै. सुप्रिया खर्डे यांनी बाळापूर अकोला येथील विठठल पांडुरंग माळी यांच्या स्वप्नात जाउन गोपाजीबाबा मुर्ती व वर्धापनदिन कार्यक्रमाविषयी दृष्टांत दिला होता, त्यातील ब-याचशा गोष्टी तंतोतंत घडल्या म्हणून संजीवन समाधी मंदिराशेजारीच कै. सुप्रिया खर्डे हिच्या स्मरणार्थ तुळशीवृदांवन स्मारक तयार करण्यांत आले आहे त्याचे लोकार्पण 26 एप्रिल रोजी होत आहे.  तरी जास्तीत जास्त भाविकांनी संजीवन समाधी गोपाजी बाबा  मुर्ती प्राणप्रतिष्ठा, सागवणी समाधी मंदिर व तुळशी वृदांवन स्मारक लोकार्पण कार्यक्रमांसाठी उपस्थित रहावे असे आवाहन बहादरपुर ग्रामथ, भजनी मंडळ, देवस्थान कमिटीने केले आहे.

Monday 22 April 2019

गंगाधर खालकर यांचे निधन


रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                                     कोपरगांव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी गंगाधर सखाहरी खालकर वय ५३ वर्षे यांचे दि. १९  रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी, दोन भाऊ -भाऊजयी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर खालकर वस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधि रांजणगाव देशमुख येथे पाझर तलावावर होणार आहे. 

Friday 12 April 2019

अंजनापूर येथे सप्ताह ; भागवत कथेचे आयोजन


ज्ञानेश्वरी चौगुले यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथेचे विवेचन 
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                      कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे शुक्रवार दिनांक १२ एप्रिल ते शुक्रवार दिनांक १९ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्तह व संगीत श्रीमदभागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून बबन महाराज गव्हाणे, बबन महाराज गाडेकर, रामप्रभू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह होत आहे. भागवतवासी ज्ञानेश्वरी चौगुले या आपल्या रसाळ वाणीतून श्रीमदभागवत कथा सांगणार आहेत.
                                        सात दिवस दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संगीत श्रीमदभागवत कथा होणार असून पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ होणार आहे. आज शुक्रवार दिनांक १२ रोजी श्रीमदभागवत गोकर्ण आख्यान, शनिवार दिनांक १३ रोजी नारद पूर्व चरित्र, परिक्षितिशाप, शुकदेवाचे आगमन, रविवार दिणक १४ रोजी श्रुष्टीवर्णन, सती चरित्र, ध्रुव चरित्र, सोमवार दिनांक १५ रोजी जडभरत चरित्र, प्रल्हाद चरित्र, समुद्र मंथन, रामजन्म, मंगळवार दिनांक १६ रोजी श्रीकृष्ण बाललीला, गोवर्धन पूजा, बुधवार दिनांक १७ रोजी श्रीकृष्ण मथुरा आगमन, कंसवध, श्रीकृष्ण रुख्मिणी स्वयंवर, गुरुवार दिनांक १८ रोजी सुदाम चरित्र परिक्षितीमोक्ष, कथा फलश्रुती अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून दररोज कथेनंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
                          शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्रीमदभागवत ग्रंथ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे व श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरूळ येथून युवकांनी आणलेल्या ज्योतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत मीराताई महाराज गोपाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अंजनापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Friday 5 April 2019

जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेमध्ये नेहमीच अग्रेसर- श्रीमती शबाना शेख


जिल्हा प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
                                   जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात त्यामुळेच जिल्हापरिषदेच्या शाळा या इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत देखील कुठेच कमी पडत नसून गुणवत्तेमध्ये नेहमीच अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे हे सर्व श्रेय जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचे आहे असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी केले.
                                     त्या कोपरगाव तालुक्यातील शहापूर, पाचोरे मळा, ओसपांढरी जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होत्या.
                                 शहापूर, पाचोरेमळा, ओसपांढरी या तिन्ही शाळेंचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमास शिक्षकांसह ग्रामस्थ, पालकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत कौतुक केले.
                                    कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शहापुर येथे पाचवी पर्यंतचे वर्ग असून केंद्रशाळा पोहेगांव अंतर्गत या शाळेने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी जुन्या व नव्या  बहारदार गीतांसह रसिकांचे चांगले मनोरंजन केले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख आर.के.ढेपले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल घारे, सुमित घारे , कैलास सदाफळ यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शिक्षक श्री सैंदाने सर, सुनीता सोनवणे मॅडम, भास्कर सोनवणे, राजश्री सोनवणे, भोजने धोंडिबा, सचिन सातपुते, अलका पाचोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर सोनवणे यांनी केले तर आभार सुनिता सोनवणे यांनी मानले.


फोटो-
कोपरगाव तालुक्यातील शहापुर  येथे  बक्षीस वितरण करतांना गटशिक्षणाधिकारी शेख मँडम,केंद्रप्रमुख ढेपले साहेब व.आदी मान्यवर.

Tuesday 2 April 2019

एरंडाच्या फोलकटातून विषबाधा; तीन गायी दगावल्या


रांजणगाव देशमुख येथील घटना ; सुमारे दोन लाखांचे नुकसान
रांजणगांव देशमुख(वार्ताहर):-
                                             कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख येथील शेतकरी नवनाथ शिवराम वर्पे यांच्या तीन गायी एरंडाचे फोलकट खाल्याने दगावल्या असून यामुळे त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
                                               दिनांक ३१ मार्च रोजी सायंकाळी गायींना पाणी पाजत असताना त्या ठिकाणी बिया काढलेले एरंडाचे फोलकट पडलेले होते ते फोलकट गायिंनी खाल्ले त्यानंतर रात्री नऊ वाजता त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला काही कळायच्या आतच त्यातील दोन गायी दगावल्या व एका गायीवर उपचार सुरु असताना ती ही मरण पावली या घटनेमुळे वर्पे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
                                               रांजणगाव देशमुख सह परिसरात मोठा दुष्काळ असल्याने जनावरांना चारा मिळत नसून गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी ऊस तोडीसाठी जात आहेत. व तेथून मिळालेल्या वाढ्यावर आपल्या जनावरांचा सांभाळ करत आहे.
                                              या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांनी विषारी वनस्पतींपासून आपल्या जनावरांचे संरक्षण करावे असे वर्पे यांनी सांगितले आहे.