Wednesday, 12 December 2018

शहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना मदत



रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):- 

                                  कोपरगाव तालुक्यातील जवळके, धोडेंवाडी, अंजनापुर, बहादरपुर, बहादबाद, वेस, सोयेगांव तसेच आदी गावांच्या वतीने  रोख रक्कम रुपये चौदा हजार मदत वीर जवान केशव गोसावी यांच्या कुटुबांसाठी केली आहेत.
                                 सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील सैन्य दलाच्या २४ मराठा बटालीयन मध्ये नेमणुकीवर असलेले जवान नायक केशव गोसावी रविवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी जम्मु काश्मीर नौशेरा भागात आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. या घटनेने त्यांचे कुटुंबिय व संपुर्ण शिंदेवाडी गावासह तालुक्यात शोककळा पसरली. त्या दुःखातुन त्यांना आधार मिळावा यासाठी अनेक संस्था व गावांकडून त्यांना मदत करण्यात आली. 
                              त्यांच्या पश्चात अपंग वडील, पत्नी व विवाहीत बहीणी असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सदर प्रसंगी सरपंच बाबुराव थोरात, उपसरपंच गोपीनाथ रहाणे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, संतोष गव्हाणे, नंदु मामा पाडेकर, बाळासाहेब चिमण रहाणे, पत्रकार विनोद जवरे, साई भक्त सुभाष रहाणे, विकास गोर्डे, दत्तात्रय गोर्डे आदी उपस्थित होते. 

फोटो -
                शहीद जवान केशव गोसावी यांचा कुटुबियांना आर्थिक देतांना सरपंच बाबुराव थोरात, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, उपसरपंच गोपीनाथ रहाणे आदी. 


महेश पाचोरे यांचा रांजणगाव देशमुख येथे सत्कार




महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून लेखापाल पदी निवड

रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
                                      कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील महेश कचेश्वर पाचोरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतल्या गेलेल्या परीक्षेमधून लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रांजणगाव देशमुख येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
                                      कोपरगाव तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील बहादराबाद येथील महेश पाचोरे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून असून मेहनत व जिद्दीच्या बळावर या यशापर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतातून केले.
                                      पाचोरे हे रांजणगाव देशमुख येथील जावई असल्याने व ग्रामीण भागातील तरुणही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले करियर करत असल्याने इतरांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांना सत्कारासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी रांजणगाव देशमुख येथील सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, भाऊसाहेब खालकर, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, रवींद्र खालकर, प्रकाश गोर्डे, कुणाल देशमुख, अशोक वामन, बाळासाहेब वामन, सोमनाथ खालकर, संपत सोनवणे, श्रावण खालकर, सचिन खालकर, सुरेश खालकर, धनंजय वर्पे, त्र्यंबक वर्पे, योगेश चव्हाण, संजय गोर्डे, शरद देशमुख, अजित गुडघे, सौरभ वामन, किशोर शिंदे, गावातील क्रिकेट संघ, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व सभासद तसेच ग्रामस्थ हजर होते.

(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल महेश पाचोरे यांचा सत्कार करण्यात आला. छाया- गोरक्षनाथ वर्पे)


विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे- गोरक्षनाथ वर्पे




जय हनुमान विद्यालयात व्यसन मुक्ती अभियान
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                             कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयात व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून विद्यार्थी दूर राहावे यासाठी प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पालक म्हणून पत्रकार गोरक्षनाथ वर्पे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
                             विद्यार्थी अवस्थेतच अनेक मुलांना विविध प्रकारचे व्यसन लागते या व्यसनापासून मुले दूर रहावी म्हणून शासकीय पातळीवर प्रशासन मोठे प्रयत्न करत असून यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत.
                           यामध्ये पालक, शिक्षक व विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम रांजणगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयात घेण्यात आला. यावेळी पालक म्हणून पत्रकार गोरक्षनाथ वर्पे यांना आमंत्रित करण्यात आले होते. वर्पे यांनी विद्यार्थी व्यसनमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विषयावर विद्यालयाच्या वतीने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या. या प्रसंगी मुख्याध्यापक ए डी दिघे सर, कालेवार सर आदींसह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रतिज्ञा केली.-  छाया- गोरक्षनाथ वर्पे)

रांजणगाव देशमुख येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे गावातील तरुणांच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले आहे. यासाठी प्रथम, द्वितीयव तृतीय अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
                                         रांजणगाव देशमुख येथे बस स्टँडच्या पाठीमागे या स्पर्धांचे आयोजन केले असून दिनांक ५ डिसेंबर पासून या स्पर्धांना  सुरुवात झाली आहे. विजेत्या संघांसाठी १११११  रुपयांचे प्रथम बक्षीस नसिरा  पोल्ट्री फार्म, पुणे यांच्याकडून, ७७७७ रुपयांचे द्वितीय बक्षीस बाबासाहेब रणधीर यांच्याकडून, ५५५५ रुपयांचे तृतीय बक्षीस यदृच्छा पेट्रोलियम व कपिला ऍनिमल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून, ४४४४ रुपयांचे चतुर्थ बक्षीस गनीभाई सय्यद व अक्षय वर्पे यांच्याकडून तर ३३३३ रुपयांचे पाचवे बक्षीस किरण व सचिन वर्पे, एस के ट्रान्सपोर्ट यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
                                       या स्पर्धांच्या उदघाटनाच्या वेळी निवृत्ती गोर्डे, सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, रामनाथ विठ्ठल खालकर, सोमनाथ खालकर, गणेश जनार्दन खालकर, डॉ. अरुण गव्हाणे, अजित गुडघे, विलास रणधीर, चंद्रभान ठोंबरे, प्रकाश गोर्डे, धनंजय वर्पे, बाळासाहेब गोर्डे, रावसाहेब खालकर, सुभान सय्यद, प्रशांत दिघे, सचिन शिंदे, नानासाहेब वर्पे, संतोष बिडवे, सचिन खालकर, निलेश खालकर, विशाल गोर्डे, आप्पा वर्पे, त्र्यंबक वर्पे, अलिशान सय्यद आदींसह ग्रामस्थ हजर होते. 

(फोटो ओळी- रांजणगाव देशमुख येथे क्रिकेट स्पर्धांच्या उदघाटनादरम्यान उपस्थित मान्यवर व क्रिकेट संघ. छाया- गोरक्षनाथ वर्पे)


Thursday, 29 November 2018

योगिता पाचोरे यांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान 


शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-

                         कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील युवा महिला शेतकरी योगिता सतिष पाचोरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
                         कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील योगिता सतिष पाचोरे यांना कृषीथॉन गौरव युवा महिला यांच्या वतीने नाशिक येथे कृषीथॉन शेतकरी प्रदर्शनात झालेल्या  कार्यक्रमात माजी उपमुखमंत्री छगनरावजी भुजबळ तसेच माझी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत योगिता पाचोरे व त्याचे पती सतिष पाचोरे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

                     या प्रसंगी योगिता पाचोरे म्हणाल्या की मी शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे शेती ही माझी माय आहे. शेतीत विविध प्रयोग करत असताना माझे भाया मनोहर पाचोरे, बाळासाहेब पाचोरे ,जाव मुक्ता पाचोरे  व माझे पती तसेच माझी सासू सासरे यांचे नेहमीच मला मोलाचे मार्गदर्शन असते हा पुरस्कार माझा नसून माझ्या परिवाराचा आहेत. 

Thursday, 22 November 2018

रांजणगाव देशमुख सह परिसरात दुष्काळ जाहीर करा- ऍड. योगेश खालकर


तहसीलदारांना निवेदन; अन्यथा आमरण उपोषण
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
 
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, अंजनापूर, बहाद्दरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मनेगाव, मल्हारवाडी, काकडी, डांगेवाड़ी आदी गावांना १५ दिवसात दुष्काळ जाहीर करावा अन्यथा दि. ३ डिसेंबर पासून रांजणगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरु काण्यात येईल असे निवेदन रांजणगाव देशमुख येथील ऍडव्होकेट योगेश खालकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
                                        या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यतील वरील गावांना ५० वर्षांपासून कायम दुष्काळ असताना हि गावे दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही. तालुक्यातील एकही गाव दुष्काळाच्या पहिल्या यादीमध्ये आलेले नाही. सध्या या गावांमध्ये पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी मोठ्या झळा सोसाव्या लागत आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. शेतकरी गावे सोडण्याच्या तयारीत आहेत.
                                        शेतकऱ्यांना अळीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाही. या गावांमध्ये चारा छावण्या सुरु करणे गरजेचे आहे. वरील गावे पोहेगाव मंडळात येत असल्याने दुष्काळी गावेही बागायत म्हणून गणली जातात. त्यामुळे या गावांचे वेगळे मंडल कार्यालय होणे गरजेचे आहे. या सर्व मागण्या ८ दिवसात पूर्ण कराव्या अन्यथा या गावांतील शेतकरी आपल्या कुटूंबियांसमवेत रांजणगाव देशमुख येथे ३ डिसेंबर पासून आमरण उपोषण करतील. आणि याची जबाबदारी सरकारची राहील.

Thursday, 15 November 2018

धोंडेवाडी साठवण तलावात पाणी पडण्यास सुरुवात


रांजणगाव देशमुख सह सात गावांचा पाणी प्रश्न तात्पुरता मार्गी
आ. कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश 

रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
    
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगांव, मनेगांव, अंजनापुर, बहादरपुर या सात गावांची असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव पाण्यांने भरून घेण्यांसाठी थकीत असलेल्या वीजबिलात आ. स्नेहलता कोल्हे यांनी तोडगा काढल्यानंतर एक्सप्रेस फीडरवरील वीज जोड तात्काळ सुरू करावेत असे आदेश राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांनी मंगळवारी दिले होते. त्याची तातडीने अमलबजावनी होउन बुधवारी विजवितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी  दिवसभर काम करत विज पुरवठा जोडुन दिला आणि धोंडेवाडीच्या साठवण तलावात पाच वाजेच्या सुमारास पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना गेल्या दोन वर्षापासुन बंद अवस्थेत होती.
                                        रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व्याजासह ३२ लाख रूपये वीज बील थकले होते. वीजबील भरण्यासंदर्भात ग्रामपंचायती सक्षम नाही. या गावामध्ये दुष्काळी परिस्थीती आहे. ही योजना चालु करावी यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राम शिंदे तसेच महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्याशी याबाबत सातत्यांने पाठपुरावा केला तसेच कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी बी गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी एन चावडा, अतिरिक्त उप कार्यकारी अभियंता जे व्ही महाजन, उपकार्यकारी अभियंता जी आर रिचवाल, पोलिस निरीक्षक श्री लोखंडे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, संबंधीत गांवचे रहिवासी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यांत आली त्यात सध्याची दुष्काळी स्थिती नागरिकांसह जनावरांचा पिण्यांच्या पाण्यांचा निर्माण झालेला प्रश्न त्यासाठी टँकर सुरू करण्यांवर होणारा खर्च याबाबत सविस्तर चर्चा होवुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी बोलणे झाले. आणी विजपुरवठा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
                                       चालु आवर्तनातुन हा तलाव पुर्ण क्षमतेने भरुन घेणे गरजेचे आहे. हा तलाव पुर्ण क्षमतेने भरला तर तिन ते चार महीने या योजनेच्या गावठाण हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागु शकेल.
                                       पाणी पडतेवेळी बहादरपरचे माजी सरपंच कैलास रहाणे, रांजणगावचे सरपंच संदीप रणधीर, रांजणगाव देशमुख चे ग्रामविकास अधिकारी शेख व इतर गावचे ग्रामसेवक व विजवितरण कंपनीचे आधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

                                        

या साठवण तलावात पाणी साठा केल्यानंतर प्रशासनास मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. आसपास पाणी उपसा होणार नाही यावर कडक नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तरच तलावात पाणी टिकून लाभार्थी गावांना त्याचा फायदा होईल.


(या तालावात पाणी साठल्यास या योजनेच्या लाभार्थी गावांना याचा फायदा होणार आहे. आ.स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने तलावात पाणी आले आहे.
  -संदीप रणधीर,  सरपंच रांजणगाव देशमुख)