Wednesday, 11 July 2018

रांजणगाव देशमुख येथे भीषण पाणी टंचाई ; उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडून उद्भव विहिरीची पाहणी


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
३० जून रोजी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख व अंजनापूर येथील शासनाकडून सुरु असलेले पाण्याचे टँकर बंद केल्याने गावात पाण्याची मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकर बंद केल्यामुळे गावात पाण्याची कशी परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी रांजणगाव देशमुख येथे भेट देऊन उद्भव विहीर व धोंडेवाडी येथील ६ गाव पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पुरवठा विभागातील श्री सोनार, मंडल अधिकारी जेडगुले, तलाठी गणेश कांगणे, ग्रामविकास अधिकारी पांडे, सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, सुखदेव खालकर, भाऊसाहेब देशमुख आदि मान्यवर हजर होते.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख सह परिसरातील गावे कायमच अवर्षण प्रवण मध्ये असून येथे पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. यंदाच्या वर्षीही पुरेसा पाऊस झाला नसून सध्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी रांजणगाव देशमुख येथे १० मे २०१८ रोजी टँकर सुरु झाला आणि ३० जून २०१८ रोजी टँकर बंद झाल्याने रांजणगाव देशमुख मध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

या परिस्थितीमुळे उद्भव विहीर व पाण्याची गावातील परिस्थिती पाहण्यासाठी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्तांनी त्यांचे स्वागत करून गावातील पाणी टंचाईची परिस्थिती सांगितली आणि टँकर सुरु करण्याची विनंती केली. तसेच धोंडेवाडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६ गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावाचीही पाहणी केली. अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी निचित यांनी सांगितले. यावेळी अमर बोगा, मैड, शिवाजी वामन, सुभाष दुशिंग, प्रकाश गोर्डे, तुषार काथे, ज्ञानेश्वर खालकर, विकास वर्पे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.


(फोटो ओळी- रांजणगाव देशमुख ता. कोपरगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाहणी करताना उपजिल्हाधिकारी संदीप निचित, मंडल अधिकारी जेडगुले, तलाठी कांगणे आदि. छाया- गोरक्षनाथ वर्पे)

No comments:

Post a Comment